20200908_095817
मुंबई, दि. 8 सप्टेंबर 2020:

सामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे 700 रुपये कमी करण्‍यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये  होणार आहे. नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार आरटी पीसीआर चाचण्यांसाठी १२००, १६०० आणि २००० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महिन्याभरापूर्वीच या चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती त्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पुन्हा एकदा कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.

आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे. ज्या ठिकाणी नमुने गोळा करण्यात येतात, त्या ठिकाणांहून ते प्रयोगशाळांमध्ये तपासण्यासाठी आणण्याचा खर्च १९०० रुपयांवरून १२०० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. तर कोविड काळजी कक्ष, प्रयोगशाळा, रुग्णालयांमधून नमुने गोळा करून ते तपासणीसाठी आणण्याचा खर्च २२०० रुपयांवरून १६०० रुपये इतका ठरवण्यात आला आहे.
रिएजंट, व्हीटीएम किट, पीपीई किट, एन ९५ मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन किटच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच आयसीएमआरने विविध मान्यताप्राप्त कंपन्यांना उत्पादनांसाठी संमती दिल्याने पुरवठा वाढल्याचे निरीक्षण सरकारने नोंदवले आहे. त्यानुसार या समितीने अभ्यास करून दिलेल्या निर्देशानुसार दरनिश्चिती करण्यात आली आहे.
कोरोना चाचण्यांचे सुरूवातीचे दर 4500 रूपये होते त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ते कमी करत 2500 रुपये केले होते आता त्यात आणखी कपात करत 1200 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *