मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२०:
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिने महाराष्ट्र व मुंबई, मुंबई पोलीस यांच्याबद्दल वादग्रस्त व आक्षेपार्ह बडबड केल्याचा संताप अजूनही व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात येऊन खाऊन-पिऊन मोठे व्हायचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करायचा हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. कंगणा व तीच्या पाठीराख्या बगलबच्च्यांना महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावले आहेच पण अशा उपऱ्यांना जरब बसणे गरजेचे आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवार व मंगळवार होत असून या अधिवेशनात राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत आहे. विदर्भात पूरस्थितीचा सामना करत आहे. केंद्र सरकार आर्थिक मदत करत नाही, जीएसटीचे राज्याचे पैसेही देत नाही अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी राजाच्या हिताचे प्रश्न मांडणे अपेक्षित आहे. राज्यासमोर हे महत्वाचे प्रश्न असताना सुशांतसिंग, कंगणाचे फालतु मुद्दे उपस्थित करुन विरोधक चर्चा करतील पण मुंबई व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या उपऱ्यांची निंदा या सभागृहात केली पाहिजे, असा घणाघात शिवसेनेचे मुख्यपत्र सामनामध्ये करण्यात आला आहे.
कंगनाने मुंबई पोलीस व मुंबईविषयी घेतलेल्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखात असे म्हटले आहे की, “विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.