विकसित भारत संकल्प यात्रा डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये…
विकसित भारत संकल्प यात्रा डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये…
मुंबई, दि. २४ डिसेंबर –
केंद्र सरकारच्या माध्यमातून डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली असून केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यात सहभागी होणार आहेत अशी माहिती भाजपा गटनेते आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे महाराष्ट्राचे प्रमुख आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरेकर म्हणाले की, लोकहिताचे घेतलेले निर्णय, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रा डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सुरू राहणार आहे. ही यात्रा गावागावात जाऊन केंद्र सरकारच्या योजना, विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवीत असतानाच तेथील वंचित लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून लाभ देण्याचा प्रयत्न असणार आहे. या सगळ्या अभियानात आगामी काळात केंद्रातील मंत्री, राज्यमंत्री भेट देऊन सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची विकसित भारत संकल्प यात्रा ही केंद्र सरकारची राज्यभर सुरू राहणार आहे. शासकीय यंत्रणा, भाजपचे स्वयंसेवी कार्यकर्ते त्यांना मदत करताहेत. नोंदणी जास्तीत जास्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउटसोबत फोटो काढणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. या योजनेचा, अभियानाचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी दरेकर यांनी केले.
भाजपा हा काम करत असताना लक्ष, उद्दिष्ट ठेवून काम करणारा पक्ष आहे. देशातील सर्व विरोधक एकत्र येऊन पंतप्रधान मोदींविरोधात फळी उभारत असतील तर देशातील जनता ५१ टक्के मोदींच्या मागे उभी राहिली पाहिजे आणि ती उभी आहे. ती संघटित करून मतदानात रूपांतरित करण्याची जबाबदारी आमची आहे. निश्चितच जनता ही पाठीशी आहे. म्हणून सरकारी पक्षाच्या सत्ताधारी पक्षाने या मोहिमेत ५१ टक्के साध्य करण्यासाठी कामाला लागावे अशा प्रकारची भुमिका असल्याचेही दरेकर म्हणाले.
