दाऊद प्रकरणी परिषदेत बोलण्यास मज्जाव !
दाऊद प्रकरणी परिषदेत बोलण्यास मज्जाव !
नागपूर, दि. १८ नागपूर : –
विरोधकांनी परिषद सभागृहात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
याच्या जवळील इब्राहिम कासकर याच्या घरातील लग्नाला भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी हजर असल्याची २८९ अनव्ये
चर्चा उपस्थित केली असता, सभापती यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांना बोलण्यास मज्जाव केला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
नाशिकमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळील इब्राहिम कासकर याच्या घरातील लग्नाला भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमाताई हिरे हजर होते. एकीकडे सत्ताधारी विरोधकांना सतत हिंदुत्ववादावरून टीका करत असतात. मात्र देशद्रोही असलेल्या दाऊदच्या घरच्या लग्नाला त्यांचेच मंत्री, आमदार व पदाधिकारी हजेरी लावतात, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत या सर्वांचे फोटो दाखवत विरोधकांनी यावर २८९ अनव्ये सभागृहात चर्चा उपस्थित केली. मात्र सभापती यांनी विरोधकांची भूमिका ऐकून घेतली नाही तसेच सभापती या एककल्लीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
सभागृहात पुन्हा एकदा उप मुख्यमंत्री यांनी येऊन यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र रातोरात पत्रिका बदलण्यात आली.
देशद्रोही इकबाल मिरची याचे संबंध माजी खासदार प्रफुल पटेल यांच्याशी असलेले चालतं. आम्ही नवाब मालिक यांच्या विरोधात बोलल्यावर सरकार त्यांची बाजू घेत. एकप्रकारे सरकार हे दाऊदला साथ देत असून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा समोर आल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य व आमदार एकनाथ खडसे, आमदार भाई जगताप, आमदार बंटी पाटील, आमदार अनिल परब यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला असता सभापती यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला. २८९ हा विरोधकांचा प्रस्ताव असतानाही सभापती या नियमाप्रमाणे सभागृहाचे कामकाज चालु देत नाहीत. एकांगीपणे सभागृह चालवितात. विरोधकांना प्रश्न विचारू देत नसल्यामुळे आम्ही आज सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
