कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू.
कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू..
नागपूर, दि. ११ डिसेंबर :
तेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणले, कर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या होत्या व तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
हल्लाबोल मोर्चात बोलताना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीत, गावात वीज नाही, पाणी नाही, शेती संकटात आहे. बरोजगार, शेतकरी, महिला, शेतमजूर, सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकार मधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे आणि या हल्लाबोल मोर्चामुळे झोपी गेलेले सरकार जागे होईल.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण तूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था बिघडवली परिणामी लघु, मध्यम, छोटे उद्योग बंद पडले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था रसातळाला घालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणले जाईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांनीही यावेळी मोर्चेकरांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केले.
