बुलढाणा घटनेतील गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा..
बुलढाणा घटनेतील गुन्हेगाराला कठोर शिक्षा करा..
मुंबई दि. २४ नोव्हेंबर :
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात १७ वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही अत्यंत विकृत असून बलात्कारानंतर आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत अमानवी असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावा. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे पालक यांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी. पीडितेच्या पुनर्वसनासाठी तिला सर्वोतोपरी सहकार्य करावे आणि या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिलेले आहेत. सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
