‘महाआवास’ मधून घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार..

0
IMG-20231123-WA0102

‘महाआवास’ मधून घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार..

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर :

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न असते. गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना तर घरकुल म्हणजे एक दिव्य स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या अनेक योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व सन 2021-22 चे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामसडक योजनेचे सचिव के. पी पाटील, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे स्वप्न असल्याचे सांगत मंत्री गिरीष महाजन म्हणाले, समाजातील अंत्योदय पर्यंत योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गरीबांना गॅस जोडणी, नळ जोडणी, वीज जोडणी, शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. शासन समाजातील शेवटच्या घटकाला पुढे आणण्यासाठी विविध योजना राबविते. या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य सध्या देण्यात येते. यामध्ये 1 लाख रूपयापर्यंत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही मागणीही पूर्ण होणार आहे.

मंत्री महाजन पुढे म्हणाले, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभुत गरजांपैकी निवारा देण्याचे पुण्याचे काम यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गभीरतेने या कामाकडे लक्ष देवून काम पूर्ण करावे. घरांचे बांधकाम दर्जेदार करावे. केवळ घरकुलच नाही, तर अन्य योजनांचा लाभसुद्धा घरकुल लाभार्थ्याला देण्यात यावा. स्वच्छतेचे महत्व सांगत मंत्री श्री. महाजन म्हणाले, स्वच्छतेचा संस्कार हा शालेय जीवनापासूनच रूजायला पाहिजे. आपला देश प्रत्येक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करीत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेने 10 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अधिक काम करावे लागणार आहे. हगणदारीमुक्तीसाठी सक्तीने कार्रवाई करावी लागणार आहे, याबाबत यंत्रणेने कार्यवाही करावी. दर्जेदार घरकुल बांधकामासाठी गोवंड्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी यावेळी केल्या.

प्रास्ताविकात प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले, महाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटूंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाआवास अभियानबाबत सादरीकरण राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान अभियान पुस्तिका, मागील वर्षाची अभियान गौरव गाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभियानाच्या माहिती पोस्टरचे विमोचनही करण्यात आले. याप्रसंगी मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल मंजूरीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, विभागीय प्रोग्रॅमर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *