20231120_202307

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ….

भंडारा, दि. २० नोव्हेंबर :

शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली. येत्या काही दिवसात कृषि फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. यंत्रणेने देखील योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. भंडारा हा तलाव, जंगल, वने तसेच धानाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. राज्याने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून सुरु केलेल्या सर्वसमावेशक पिकविमा योजनेत पहिल्याच वर्षी 1 कोटी 66 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी ही योजना ठरली आहे.

 

शासनाने अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस यांचे मानधन वाढविले. पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा देखील विचार सुरु आहे. शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढविली. ओबीसी घटकाकरीता मोदी आवास योजना सुरु केली असून ओबीसीसाठी 10 लाख तर अनुसूचित जाती, जमातीसाठी 5 लाख घरांचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. सर्वसामान्यांना घर मिळाले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे.

 

भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे 352 कोटी रुपयांचा जल पर्यटन प्रकल्प आपण राबवितो आहे. याप्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसेखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाने देखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. 2024 च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पुर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *