कंगणाने बापाची भाषा करत पुन्हा गरळ ओकली.
मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२०
मुंबई पोलिसांचा अपमान करून मुंबई शहरालाही पाकव्याप्त काश्मीर म्हणणारी वाचाळ नटी कंगणाने पुन्हा गरळ ओकली आहे. आपल्याला मुंबईत येण्यावरुन धमक्या मिळत असून ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे थेट आव्हान तिने दिले आहे. कंगणाने बापाची भाषा केल्यानंतर मुंबईतून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मुंबई ही मराठी माणसाच्या बापचीच आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी त्यांचा बाप दाखवावा असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगणाचे नाव न घेता तोफ डागली. “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र” असे खणखणीत ट्वीट करुन कंगणाला तीची जागा दाखवून दिली आहे.
“पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे मोठे कारस्थान दिसत आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या महिला आघाडीने कंगणाच्या फोटोला जोडे मारुन निषेध केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या कंगणाचा समाचार घेताना म्हणाल्या, “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगना तू उतरलेल्या विमानतळापासून तुझ्या घरापर्यंत जी मुंबई पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे,” “शुटींगच्या सेटपासून चित्रपटगृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे. सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलीस देशाचा अभिमान आहेत,” अशी टीका चाकणकर यांनी टीका केली आहे.