उद्धवजी, ‘मातोश्री’ म्हणजे महाराष्ट्र नव्हे…!
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे टिकास्त्र.
राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा येत नाहीत.
मुंबई, दि.२ सप्टेंबर :
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. कारण राज्यामध्ये कोविडसारखे महाभयंकर संकट आले तरी मातोश्री सोडून मुख्यमंत्री ठाकरे कधीही बाहेर जनतेत गेले नाहीत. आक्रोश झाल्यांनतर एखाद्या ठिकाणी बाहेर पडले असतील अशी टिकेची झोड विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उठविली.
कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ नाही. सांगलीला महापूर आला, सातारा कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत. सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य कारभार चालिवता येत नाही, यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे व उद्रेक झाला आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
एवढे महिने राज्य सांभाळूनही राज्यात तर सोडाच, मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा यायला तयार नाहीत. मागे कोविड संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
पत्रकार रायकर यांचा आज मृत्यू झाला. मग काय झाले तुमच्या आरोग्य यंत्रणेचे ? मुख्यमंत्री पुण्याला गेले, कोविड सेंटर सुरु केले, मोठं मोठ्या घोषणा करुन आलात. पण साधी एक रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज त्या पत्रकाराला नाहक आपला जीव गमवावा लागला. राज्यात कधी नव्हे इतका विस्कळीतपणा या सरकारच्या काळात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असो, आपण स्वतः विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत, अगदी शरद पवार साहेब सुद्धा काही ठिकाणी जाऊन आले. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही आणि हे राज्याच्या हिताचे नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
