खाजगी रुग्णालयांकडून पेशंटची लूटमार.
मुंबई, दि 2 सप्टेंबर:
कोरोनाच्या संकटात काही लोकांनी लुटण्याचा उद्योगच सुरु केला आहे. खाजगी हॉस्पिटल्सनी तर कोरोना पेशंटला देत असलेली वागणुकीचे एक एक किस्से संताप आणणारे आहेत. विनाकारण कोरोना पेशंट ठरवून त्यांना लुटण्याचे धंदा तेजीत सुरु आहे. काही हजार रुपये अनामत भरल्याशिवाय ऍडमीट करुन घेण्यास नकार दिला जात आहेत परंतु अनेक पेशंटना व्यवस्थित उपचार न देता फक्त भरमसाठ बिलं दिला जात आहेत. उपचाराच्या नावाखाली अक्षरशः दरोडा टाकला जा आहे आणि त्यातून पेशंट दगावला तर बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही असा मुजोरीपणा केल्याचे अनेक घटना आहेत.
आता हे मालाडचा प्रकार पहा…..मालाड पश्चिम येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एका सामान्य नागरिकाचे तब्बल २१ लाख रुपयांचे बिल केले. एवढा खर्च करुनही तो पेशंट वाचला नाही आणि ८ लाख रुपये भरूनही मृतदेह ताब्यात देण्यात येत नाही असा मुजोरी या रुग्णालयाने केली. शेवटी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माध्यमातून या हॉस्पिटलला जाब विचारण्यात आला.. ‘हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस नंतर पुन्हा बायोपॅक चार्जेस म्हणजे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस लावण्यात आले. एका पीपीई किटसाठी ३५०० रुपये लावले आहेत. ‘बायोमेडिकल वेस्ट चार्जेस २५०० रुपये प्रमाणे पूर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये आकारण्यात आले आहेत. अशाप्रकारे ही लूटमार सुरू आहे. औषधांचे बिल तब्बल १० लाख ६२ हजार करण्यात आले. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या रुग्णालयावर तात्काळ गुन्हा दाखल करा तसेच पेशंटच्या मृत्युप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध तात्काळ ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करा, अन्यथा सामान्यांची लुटमार करणाऱ्या या रुग्णालयाला टाळे ठोकू असा इशाराही दरेकर यांनी दिला.
खाजगी रुग्णालयांना सरकारने दर निश्चित करुन दिलेले असतानाही त्याकडे अशी मुजोर रुग्णालये दुर्लक्ष करतात. सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवतात. सरकारच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेशंट जात नाहीत, हजार बेडची व्यवस्था असूनही तिथे फक्त ५० रुग्ण आहेत. ९५० बेड रिकामे आहेत. पण रिकाम्या बेडचे भाडे ठेकेदारांना देण्यात येत आहे. ही लूटमार आधी बंद केली पाहिजे. येथे रुग्णाचे नाही तर ठेकेदारांचे हित जपले जात आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून त्याचा पर्दाफाश आम्ही या विधीमंडळाच्या अधिवेशनात करू, असा इशाराही दरेकर यांनी दिला.