20230905_233255

न विचारता पोलीस लाठीचार्ज करतील ?

जळगाव, दि. ५ सप्टेंबर ;

तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही. तुम्हाला न विचारता पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नाही हे यावरून सिद्ध होतं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केली.

जयंत पाटील जळगावच्या स्वाभीमान सभेत बोलत होते, ते पुढे म्हणाले की, शरदचंद्र पवार यांच्या प्रेमाखातर जळगाव येथे स्वाभिमान सभेसाठी जमलेल्या जनसमुदायाला पाहून मी भारावून गेलो. अहंकाराचा नायनाट करणारे प्रभू श्री राम, सत्यासाठी लढणारे पांडव, संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, कवियित्री बहिणाबाई चौधरी, ना. धो. महानोर अशा महान लोकांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलीसांमार्फत अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. त्यात माताभगिनी, लहान मुले देखील जखमी झाली. कायदा आणि सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. गृह विभागाचा तोल गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लाठीचार्जचे आदेश आम्ही दिले हे सिद्ध करा असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणत आहेत. तुमच्या आदेशविना असे क्रूर कृत्य पोलीस प्रशासन करत असतील तर तुम्हाला सरकार मध्ये राहण्याचा अधिकार आहे का?

आपले काही फितूर दिल्लीश्वरांच्या चरणी लीन झाले आहेत. मात्र कोणापुढे गुडघे टेकण्याची वृत्ती खानदेशातील लोकांची नाही. या सरकारचा सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे. राज्यातील शेतीची अवस्था अत्यंत बिकट आहे. पेरलं ते उगवेल की नाही, उगवलं ते विकेल की नाही अशी परिस्थिती आहे. आधारभूत किंमत अत्यल्प आहेत. राज्याच्या दाराशी दुष्काळाचे सावट आहे. आम्ही सरकारकडे मागणी केली की राज्यभरात टँकरची व्यवस्था करा, चारा छावण्या उभारा आणि राज्यात दुष्काळ जाहिर करा. पण सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला शासन आपल्या दारीचे भव्य कार्यक्रम करत आहेत.

एकनाथराव खडसे यांनी या जिल्ह्यात गेली ३० वर्षे झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळे येथून पुढे शरद पवारांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे शिवधनुष्य आपण सहज पेलाल हा आमचा विश्वास आहे.

देशभरात घडणाऱ्या घटनांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये डोळसपणे मतदान करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या पक्षाची पडझड झाली असली तरी जळगाव जिल्ह्याने मात्र एक संघता कायम ठेवली. प्रचंड ऊर्जेने, जुन्या आणि नवीन पिढीच्या साथीने आपण नक्कीच सकारात्मक कामगिरी करू हा विश्वास आहे.

आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापुढे समर्थ पर्याय ठेवू. सर्वांनी ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघ उभारा. जळगाव जिल्ह्यात फार पडझड झालेली नाही. तुम्ही सर्व जण एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे निवडून येतील. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात जळगावमध्ये स्वाभिमान सभा होत आहे. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले येवला आणि बीडमधील सभेपेक्षा आपल्याला जळगावमध्ये जास्त उत्साह जाणवला. शरद पवारांचे जळगाव जिल्ह्याशी ॠणानुबंध आहेत. आता पुन्हा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आणायचे आहेत. आता आपण व्हिडिओ पाहिलेत त्यामध्ये फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. राष्ट्रवादीशी युती करणार नाही असे सांगितले होते. मात्र आता त्यांच्यासोबतच मंत्रिमंडळात बसले आहेत. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे म्हटले होते पण लग्न केले. राज्याला दिलेला एकही शब्द त्यांनी पाळला नाही. आता महाराष्ट्रात, मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. मराठा समाज ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण मागत आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे त्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती करावी. सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *