Ads

-

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ‘ओव्हरफ्लो’ नाही ! 

By Xtralarge News

August 20, 2023 9:11 pm

Ads

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ‘ओव्हरफ्लो’ नाही !

मुंबई,  दि. २० ऑगस्ट ;

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे तलाव हे ओसंडून वाहत असल्याच्या अर्थात ‘ओव्हरफ्लो’ होत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांद्वारे व काही प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहेत. तर काही माध्यमांद्वारे मुंबईची पाण्याची चिंता मिटली असल्याचा आशय मांडणाऱ्या बातम्या प्रसारित होत आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार खुलासा करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही.

या अनुषंगाने जल अभियंता खात्याने कळविले आहे की, विहार तलाव १०० टक्के व तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार व तुळशी तलावांमधील ‘जलसाठा’ हा अत्यल्प आहे. त्यामुळे या दोन तलावांमधील पाणीसाठ्याच्या आधारे व्यापक निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.

प्रमुख तलावांपैकी सर्वात मोठे तलाव असणाऱ्या ‘अप्पर वैतरणा’ तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के आहे. तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकंदरीत जलसाठा हा ८३.५१ टक्के आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईची पाणी चिंता ही काही प्रमाणात निश्चितपणे दूर झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे मिटलेली नाही, ही बाब स्पष्ट होत आहे.

दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते, असेही जल अभियंता खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे व परिरक्षणाच्या आवश्यकतांमुळे तलाव पूर्णपणे भरलेले नसताना देखील तलावांचे दरवाजे (गेट) काही प्रमाणात उघडावे लागतात. यंदाच्या पावसाळ्यात ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलाशय’ अर्थात ‘मध्य वैतरणा’ तलावाचे २ दरवाजे या आठवड्यात उघडण्यात आले होते. त्यातून विसर्ग झालेले पाणी हे त्याच नदी प्रवाहात खालच्या बाजूला असणाऱ्या ‘मोडकसागर’ तलावात साठविण्यात आले. सदर पाणी हे तांत्रिक कारणांमुळे सोडण्यात आले होते. मात्र, काही माध्यमांनी त्याचा अर्थ तलाव ओसंडून वाहू लागला असा काढला. जो वस्तुस्थितीला धरून नाही.

वरील सर्व बाबी लक्षात घेता महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे मुंबईकर नागरिकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे.

No comments to show.

Leave a Comment