जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार कुचकामी ठरलं..
जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार कुचकामी ठरलं..
मुंबई, दि. ४ ऑगस्ट : –
शेतकरी, महिला, तरुण, बेरोजगारी आदी विषयांवर तीन आठवडे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष जनतेचा आवाज उठविण्यात यशस्वी झाला आहे. मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यास भ्रष्टाचारी सरकार हे कुचकामी ठरलं असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. विरोधी पक्ष जनतेच्या दरबारात जाऊन सरकार विरोधात त्वेषाने लढणार असल्याचा संकल्प केला असल्याची माहिती दानवे यांनी दिली.
सरकारच्या उद्योग विभागाने काढलेली श्वेतपत्रिका ही काळी पत्रिका ठरली आहे. केंद्राने राज्यात होणारे सर्व प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातला नेले. बोगस बियाणांबाबत सरकारने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कापसाला भाव न देऊन शेतकऱ्यांना हे सरकार दिलासा देऊ शकले नाही. पुरवणी मागण्या मंजूर करून असमान निधी वाटप करून ९० मतदारसंघांना त्यांच्या विकासापासून दूर ठेवण्याचे पाप या सरकारने केले आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून विरोधी पक्षाने या सरकारला पूर्णपणे घेरलं मात्र सरकारने त्याला सामोरे न जाता पळ काढण्याचा प्रयत्न केला. कोणतंही समाधानकारक उत्तर सरकारकडून देण्यात आलं नाही.
सरकारने जे जे बिल आणले ते मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी मूळ प्रश्नापासून पळ काढला.सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री उत्तर देण्यास गैरहजर राहिले. यावरून हे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना समर्थन देण्याचं पाप करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
