राजकारणातील ‘संकटमोचक’ हरपला…
मुंबई, दि. ३१ ऑगस्ट २०२०
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज सोमवारी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती खालावली होती. १० ऑगस्टला लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देशभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, काँग्रेस अद्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे नेते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. प्रणव मुखर्जींच्या निधनाने भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचे निधन ही भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यांच्या शोकसंदेशात म्हणतात, ’माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविधपदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढविला. प्रणवदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणतात की,’ प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावला आहे.त्यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित होते. देशाची अर्थ निती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्वाचे योगदान दिले.आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली. त्यांच्या रूपात भारताचे एक अनुभवी मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्रणव मुखर्जी यांचा परिचय…
प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालधील वीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. बंगाल विधानसभेचे ते सदस्यही होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
१९६९ मध्ये ते काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे सदस्य झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंहराव व डॉ. मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात अर्थ, परराष्ट्र, संरक्षण अशा अत्यंत महत्वाच्या पदावर काम करत त्यांनी आपली छाप सोडली. प्रणव मुखर्जी हे लोकसभा व राज्यसभेचे प्रदिर्घकाळ सदस्य होते. विविध संसदीय समित्यांचेही काम त्यांनी पाहिले. राजीव गांधी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्वतःत्र पक्ष काढला पण नंतर ते काँग्रेसमध्ये परतले. सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली.
प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे नेते असले तरी सर्व पक्षातील नेते त्यांच्याकडे सन्मानाने आणि आदराने पाहत. कोणताही वादाचा विषय निघाला तर प्रणवदा हे यशस्वी मधस्थी करायचे. काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. देशासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानीत केले.
दिल्लीच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. युपीए सरकारच्या कार्यकाळात व त्यानंतरही काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा संकटात सापडला तेव्हा त्यांनी संकटमोचकाची जबाबदारी अत्यंत कुशलपणे हाताळली, म्हणूनच त्यांना संकटमोचक असेही संबोधतात.
