ZP शिक्षकांचे निवृत्तीवेतन वेळेवर देणार.
ZP शिक्षकांचे निवृत्तीवेतन वेळेवर देणार.
मुंबई दि. २८ जुलै :
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर, निमशासकीय कर्मचारी यांचे मासिक निवृत्तीवेतन वेळेवर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन आज विधानपरिषदेत आमदार नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
सेवा निवृत्ती नंतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी यांना निवृत्तीवेतन वेळेवर मिळणे आवश्यक असून, यामध्ये विलंब होत असल्याने या सर्व बाबी लक्षात घेऊन निवृत्तीवेतन देण्याच्या अनुषंगाने ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण, तसेच वित्त विभाग या तिन्ही विभागाच्या समन्वयातून एक अद्ययावत ऑनलाईन प्रणाली विकसित करून येणाऱ्या अधिवेशना पुर्वी हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सभागृहास दिले.
निवृत्ती वेतनधारकांना वेळेवर निवृत्तीवेतन देण्यासाठी सध्या वेतन कोषागार स्तरावर निवृत्तीवेतन वाहिनी आज्ञावली मार्फत केले जाते. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (इ- कुबेर) व स्टेट बँकेच्या (C.M.P) प्रणालीद्वारे संबंधित निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही कोषागार मार्फत जमा करण्यात येते. यामध्ये अस्तित्वात असलेली प्रणाली सुधारणा करून ग्राम विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच वित्त विभागाच्या समन्वयातून या विषयावर तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने बैठक घेऊन, आवश्यक त्या सुधारणा लवकरात लवकर करण्यात येतील, असे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
