अदानी हटाओ, धारावी बचाओ !
अदानी हटाओ, धारावी बचाओ !
मुंबई, दि. २४ जुलै.
धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांचा पुरेसा सल्ला घेण्यात आलेला नाही. पुनर्विकास आराखड्यात लघु उद्योग मालक आणि गृह-आधारित व्यवसायांसाठीच्या धोरणाबाबतही स्पष्टतेचा अभाव आहे. या विकास आराखड्यात पारदर्शकता आणावी अशी धारावीतील नागरिकांची मागणी आहे परंतु अदानी समूह रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांकडे लक्ष देणार नाही त्यामुळे ‘अदानी हटवा, धारावी वाचवा’ अशी मागणी आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.
धारावी पुनर्विकास प्रकल्प जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे. अदानी समूहाला १० कोटी चौरस फूट विकास हक्क ५,०६९ कोटी रुपयांना मिळत आहेत. सरकारच्या पैशातून रेल्वेची अतिरिक्त जमीन मिळत आहे.या भागातील शेवटचे सर्वेक्षण २००८ मध्ये करण्यात आले होते आणि संरचनेची पात्रता तारीख १ जानेवारी २००० ठेवण्यात आली होती, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) नुसार ती २०११ आहे. जर सरकारला खरोखरच धारावीचा पुनर्विकास करायचा असेल तर नवीन सर्वेक्षण केले पाहिजे.
धारावी मधील ८० टक्के लोक स्थानिक युनिट्स आणि व्यवसायांवर अवलंबून आहेत, जे संरक्षित करणे गरजेचे आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबाला धारावीबाहेर पाठवू नये. अदानीला सहा कोटी चौरस फूट क्षेत्रफळ विक्रीसाठी मिळत आहे, ज्यातून ते किमान ३,००,००० कोटी रुपये कमवणार आहेत. या प्रकल्पातून मोठा पैसा मिळणार आहे.मग धारावी प्रकल्पात कोणाची भरभराट होणार स्थानिक रहिवासी की अदानी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धारावीतील कोळीवाडे वाचले पाहिजेत त्याच्यासाठी वेगळी योजना तयार करावी. कुंभारवाड्यातील लोकांना ४ एफएसआय प्रमाणे स्वतंत्र जागा देण्यात यावी. अशा सगळ्या धारावीकरांच्या मागण्यांचा विचार करून त्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
