Ads

-

पूर्व विदर्भात पूरस्थिती; १४८ गावांना तडाखा.

By Xtralarge News

August 31, 2020 8:28 am

Ads

नागपूर, 31 ऑगस्ट:

मध्य प्रदेशात झालेला मुसळधार पाऊस व त्यानंतर संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने पूर्व विदर्भाला पूराचा फटका बसला आहे. चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.   वैनगंगा नदीला महापूर आल्याने भंडारा,  गोदिया, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मदत व बचावकार्या साठी एनडीआरएफ चे पथक आले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपापल्या जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली.

पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. २७ हजार ७२१ पूरग्रस्तांपैकी १८ हजार २६१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५१, गडचिरोली जिल्ह्य़ातील ४, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६, भंडाऱ्यातील ५७ आणि गोंदियातील ३० अशा १४८ गावांतील २७,७२१ ग्रामस्थांना पुराचा फटका बसला आहे.

भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाली आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली.
भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत.
बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.

No comments to show.

Leave a Comment