शाळा-कॉलेज बंद, परीक्षा मात्र घ्या!
मुंबई, दि. ३० ऑगस्ट:
केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या अनलॉक-४ च्या गाईडलाईन्स नुसार शाळा, महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत तर युजीसी म्हणते परीक्षा घ्या. राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचे तरी काय? 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा? असा सवाल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विचारला आहे.
सामंत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना कधी वेठीला धरले नव्हते आणि कधी धरणारही नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच परीक्षेसंदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता. उगाचच विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये. न्यायालयाचा व यूजीसीचा नक्की आदर आहे.
कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहूनच अंतिम वर्षांच्या अंतिम परिक्षा घेण्यास महाराष्ट्र सरकारने नकार दिला होता. परंतु केंद्र सरकार व यूजीसी यांनी मात्र परीक्षा घेतल्याच पाहिजेत असा अट्टाहास पहिल्यापासूनच धरलेला आहे. परीक्षा घेऊ नये यासाठी काही पक्ष व संघटना यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती पण न्यायालयानेही परीक्षा घेतल्याच पाहिजेत असे निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणात विद्यार्थ्यांना मात्र नाहक त्रास होत असून त्यांना वेठीस धरले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परीक्षा कशा व कधी घ्यायच्या यासाठी रविवारी कुलगुरूंच्या समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये माजी कुलगुरू वेरुळकर, माजी कुलगुरू खोले, हे निमंत्रित सदस्यही होते. सोमवारी दुपारी पहिल्या बैठकीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. या अहवालानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन परिक्षेसंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे सामंत म्हणाले..
