Ads

--

‘त्या’ अधिकाऱ्यांची CM/DCM कडे तक्रार करणार !

By Xtralarge News

July 9, 2023 7:36 pm

Ads

‘त्या’ अधिकाऱ्यांची CM/DCM कडे तक्रार करणार !

मुंबई दि. ९ जुलै –

सिद्धार्थ विहार हॉस्टेलचा भूमिपूजन सोहळा भव्य आणि सर्वांना विश्वासात घेऊन करणे अपेक्षित होते मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांची दिशाभूल करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बॅनरखाली आम्हाला डावलून चुकीच्या पद्धतीने सिद्धार्थ विहार हॉस्टेलचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुमंत भांगे, दिनेश डिंगळे हे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्या विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

बांद्रा पूर्व येथील कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.

वडाळा येथील सिद्धार्थ विहार हॉस्टेलला आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक महत्व राहिले आहे. मी स्वतः महाविद्यालयीन विद्यार्थीं असताना सिद्धार्थ विहार होस्टेलला राहिलो आहे. भारतीय दलित पँथरच्या केंद्रस्थानी सिद्धार्थ हॉस्टेल राहिले आहे. ते जीर्ण झाल्यानंतर त्याची नव्याने उभारणी करण्यासाठी माझ्या प्रयत्नाने शासनाकडुन ७८ कोटींचा निधी मंजूर केला.

८ जुलै हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आहे. या सोसायटी मध्ये वाद आहेत. मात्र धर्मदाय आयुक्तांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अधिकृत चेयरमन म्हणून मला मान्यता देणारा निर्णय दोन वेळा दिला आहे.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अधिकृत चेयरमन मी असून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बॅनर खाली सिद्धार्थ विहार हॉस्टेल च्या भूमीपूजनात चुकीची माहिती देऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांना बोलविण्यात आले.या भूमीपूजनात मला डावलण्यात आले.

पीपल्स एज्युकेशन सोसिटीशी कोणताही संबंध नसणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अनधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यास पालकमंत्री उपस्थित राहणे चूक आहे. मी शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचा घटक पक्ष आहे. असे असताना पालकमंत्री केसरकर यांनी योग्य माहिती घेऊन या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत निर्णय घ्यायचा होता. यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी दिनेश डिंगळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी चूक केली आहे. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्याबाबत आम्हाला त्यांचा आदर आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी त्यांचा काही संबंध नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अधिकृत चेयरमन मी असल्याची माहिती रामदास आठवले यांनी देऊन सिद्धार्थ विहार हॉस्टेल भूमीपूजनात त्यांना डावलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment