फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांवरच आजही कायम !
फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांवरच आजही कायम !
नाशिक, दि. ८ जुलै :-
राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी आपले काम अविरत सुरु राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपली वाटचाल कायम सुरूच राहील असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले. मुंबईतून सांताक्रुझ येथील निवासस्थान येथून नाशिककडे निघाल्यावर ठाणे, मुलुंड, मानकोली नाका,कल्याण जंक्शन राजनोली, वाशिंद, इगतपुरी,घोटी, रायगड नगर,शहरातील पाथर्डी फाटा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्याची आतषबाजी करत फुलांचा वर्षाव करून वाजतगाजत जंगी स्वागत केले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे जल्लोषात स्वागत झाल्यावर येथील कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ हेही होते.
छगन भुजबळ म्हणाले की, राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजितदादा व आम्ही सर्व सहकाऱ्यांनी हे पाऊल उचललं. हा प्रसंग येऊ नये म्हणून एकदा नाही अनेकदा प्रयत्न केले. मात्र हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून सरकारच्या माध्यमातून राज्यातील जनतेसाठी विविध विकास कामे करण्यात येतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण पुढे वाटचाल करणार आहे.
उपस्थित जनसमुदायाचे आभार मानत यापुढील काळातही सर्व लोक आमच्या पाठीशी राहाल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
