‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ’ !
‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ’ !
नाशिक, दि. ८ जुलै –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष फुटीनंतर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांचा समाचार घेतला. ८२ वर्षाचे वय झाले घरी बसा असा म्हणणाऱ्या अजित पवारांना उत्तर देत आपली दिशा स्पष्ट करत ‘ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू’ …असे म्हणत जोरदार प्रतिउत्तर दिले.
आताच्या मंत्रीमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. वय असते…नाही असे नाही…पण केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
नाशिकला स्वातंत्र्याच्या इतिहासात वेगळे महत्व आहे. कॉंग्रेस पक्षाचा इतिहास बघितला तर नाशिकला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले. त्यावेळी आमच्या तरुणांचे सामाजिक व राजकीय आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनचे संकट देशावर आल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी संरक्षण मंत्री म्हणून दिली. चव्हाणसाहेबांचा लोकसभेत प्रवेश हा नाशिकमधून झाला होता. नाशिककरांनी त्यांना अविरत साथ दिली ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात नाशिकमधून करावी वाटल्याने दौऱ्याची सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर नाशिकच्या लोकांशी चर्चा करुन येवल्यातून निवडणूक लढवावी असे सूचवले होते. येवला आमच्या विचारांचा तालुका आहे. १९८० साली आम्ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला त्यावेळी नाशिककरांनी सर्व जागा आम्हाला निवडून दिल्या. लागोपाठ दोनदा जर्नादन पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भुजबळांना सेफ जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची संमती घेतली व आम्हाला यश आले.
