वालचंद हिराचंद यांचा तिन्ही लोकात भारताचा झेंडा :
वालचंद हिराचंद यांचा तिन्ही लोकात भारताचा झेंडा :
मुंबई, दि. २८ जून ;
स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने राजभवन येथे ५० व्या वालचंद स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला प्रामुख्याने उपस्थित होते.
आपण शाळेत असताना ‘मेड इन जर्मनी’च्या वस्तूंचा बोलबाला होता; पेनाची निब सुद्धा जर्मनीची असायची. कालांतराने ‘मेड इन जपान’चा काळ आला व अलीकडे ‘मेड इन चायना’चे दिवस आले. परंतु एकविसावे शतक ‘मेड इन इंडिया’चे असेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. आज भारत आत्म-निर्भर देश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याचे मोठे श्रेय वालचंद हिराचंद यांचेकडे जाते, असे राज्यपालांनी सांगितले.
वालचंद हिराचंद यांनी जहाज वाहतूक क्षेत्राला संजीवनी दिली. त्यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र चेंबरने उद्योग व वाणिज्य या शिवाय कृषिक्षेत्राला महत्व दिले असे सांगून चेंबरने फलोत्पादन, फुलशेती, भरडधान्य शेती यांसह सेंद्रिय शेतीला चालना द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
