Ads

--

काहीही करा लोक ‘त्या’ आमदारांना गद्दारच म्हणतात !

By Xtralarge News

June 24, 2023 12:23 pm

Ads

काहीही करा लोक ‘त्या’ आमदारांना गद्दारच म्हणतात !

 

मुंबई, दि. २२ जून ;

देशात आज इव्हेंटचे राज्य सुरू आहे. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट केला जात आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली जात आहे. कोणीही कितीही दडपशाही केली तरी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लोक गद्दारच म्हणत आहेत. पन्नास खोके म्हटले तर आपसूकच तोंडातून एकदम ओके निघते असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

आज राज्यभरात दंगली घडत आहे. दंगलीचा पॅटर्न बघितला तर लक्षात येईल की जिथे भाजप शिंदे गटाची ताकद नाही तिथे या दंगली घडत आहे. मला सरकारमधील मंत्र्यांना सांगायचे आहे की तुम्ही काहीही करा पण महाराष्ट्रात हा प्रकार थांबवा.

याच व्यासपीठावरून २४ व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे का उभा राहिला हे आपल्याला कळले असेल. राज्याचा असा कोणताही कानाकोपरा नाही तिथे पवारांचे नाव नाही. जिथे निवडणूक लढलो नाही तिथेही पवारांचे नाव आहे. शरद पवारांच्या रुपाने विचारांची शिदोरी आपल्यासोबत आहेत.

आज परिस्थिती विचित्र आहे, शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, जनसामान्यांच्या हक्क मारले जात आहेत. शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, जनसामान्यांच्या हक्कासाठी हा पक्ष स्थापन केला गेला होता. हा पक्ष आजपर्यंत त्याच वाटेवर चालत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांचे विचार लोकांना एक आशेचा किरण वाटत आहे. पवारसाहेबांचे या देशात मोठे योगदान आहे. कृषीमंत्री असताना त्यांनी आयात करणारा देश निर्यात करणारा देश बनवला

आज कृषी मंत्री कोण हे लोकांना माहिती नाही. ओडिशामध्ये रेल्वे दुर्घटना झाली तेव्हा रेल्वेमंत्री कोण हे देशाला कळले. नाहीतर पंतप्रधान मोदीच हिरवा झेंडा दाखवायचे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेले आहे याची माहिती आपण घ्यावी… त्यांचे धागेदोरे नागपूरच्या कोणत्या नेत्यापर्यंत आहेत. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मराठा आरक्षणाच्या विरोधात नेमकं कोण आहे असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

१९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटींचा निधी देऊन या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण केले. मी स्वतः जलसंपदा मंत्री म्हणून धरणाच्या कामाला ३ वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले. कोविडची भयंकर परिस्थिती असताना देखील आम्ही न थांबता हे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले हेही जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

कोरोनाची परिस्थिती असताना देखील १४० कामे आम्ही पूर्ण केली. तंटामुक्त अभियान, २५-१५ योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, अशा विविध योजना या राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. परवा नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा झाला परंतु देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ति राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही. का त्या आदिवासी होत्या म्हणून ? खेळाडू उपोषण करतायत त्यावर बोलायला देशाच्या नेत्यांना वेळ नाही. मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे मात्र पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले आहे यावर जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आपल्या राज्यात आपल्या महापुरुषांचा राजरोसपणे अपमान केला जात आहे. माजी राज्यपालांचा तर सध्याच्या सरकारमधील लोकांनी जाताना सत्कार केला. पण यांनी शिवबांबाबत खालच्या पातळीचे विधान केले. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येतील यासाठी आपण सर्वजण आज एकजुटीने आणि एक दिलाने काम करण्याचा संकल्प करूया. येणारा काळ हा मोठा संघर्षाचा आहे. निवडणूक कधी होईल सांगता येत नाही पण आपण ग्राऊंडवर तयार रहायला हवे असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment