कोल्हापूरात 12 रूग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा.

0
FB_IMG_1598683246456

कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – मुख्यमंत्री 

कोल्हापूर, दि. 29 :

कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला.
खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल. पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 55 वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर या अंतर्गत उपचार करण्यात येईल.

महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *