नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई..
नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देशविरोधी लढाई..
गडचिरोली, दि २ मे :
नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची ती लढाई आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते..फडणवीस म्हणाले, या नक्षल कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे. त्यामुळेच एकिकडे या समस्येविरोधात लढणार्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तर दुसरीकडे जनतेशी संवाद साधण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. गडचिरोलीत यापूर्वीही मी दोन वेळा मुक्काम केला आहे आणि आजही मुक्काम करणार आहे. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो.
आज शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. पोलिस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. गडचिरोलीत कनेक्टिव्हीटी वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरजागडच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येते आहे, असेही त्यांनी सांगितले.
