अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल प्रकरणी ३ जुलै रोजी मुंबई हाय कोर्टात सुनावणी :
अंधेरीच्या कामगार हॉस्पिटल प्रकरणी ३ जुलै रोजी मुंबई हाय कोर्टात सुनावणी :
मुंबई, दि. २७ एप्रिल:
अंधेरीतील अद्ययावत कामगार हॉस्पिटल पुन्हा सुरु करावे यासाठी आता कोर्टात धाव घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले हे कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद आहे. सरकारकडून मिळणारा प्रतिसाद समाधानकारक नसल्याने शेवटी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरीतील कामगार हॉस्पिटल पुन्हा सुरु करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुनही तांत्रिकबाबी पुढे करुन चालढकल केली जात आहे. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असूनही सरकार मात्र हॉस्पिटल सुरु करावे यासाठी गांभिर्याने काम करत नाही. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी याप्रश्नी मुंबईत एक बैठक घेऊन तीन महिन्यात OPD विभाग सुरु करु असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हॉस्पिटलमधील कोणतीही आरोग्य सेवा सुरु करण्यात आलेली नाही. आश्वासन देऊनही हॉस्पिटल सुरु होत नसल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकार काहीच करत नसल्याने हे हॉस्पिटल लवकर सुरु व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये OPD , IPD (350 बेड्स) ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून हे रुग्णालय बंद आहे, असेही राजेश शर्मा म्हणाले.
