Ads

---

पाठीत वार करुन सरकार पाडल्याचा बदला घेणारच !

By Xtralarge News

April 27, 2023 4:46 pm

Ads

पाठीत वार करुन सरकार पाडल्याचा बदला घेणारच !

मुंबई, दि. २७ एप्रिल:

महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात २५ मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. परंतु त्यातील बरेचसे भाजपावाल्यानी डोळ्यादेखत पळवुन नेले, ओरबाडुन नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार सांगत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? ज्या पद्धतीने पाठीत वार करुन मविआचे सरकार पाडलं त्याचा बदला घ्यायचाय आणि तो घेणारच असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

भारतीय कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. सरकार पाडल्याची चिड व संताप त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. भाजपा व शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांनी तुफान हल्ला केला. ते म्हणाले की, प्रत्येकाचे दिवस असतात, आपले दिवस गेलेत असं मी म्हणूच शकत नाही, ते पुन्हा आणायचेच… त्यावेळेला आपण जो काही प्रसाद देऊ, तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिल.  सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत २३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी करार केला, कंपनी महाराष्ट्रात येणार म्हणून फोटोही काढले, ती जोडे बनवणारी कंपनी होती तीदेखील तामिळनाडूत गेली, हे बसले जोडे पुसत…फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोकं राज्य करत आहेत.

शिवसेना सत्तेत असताना काय होतं आणि काय होत नाही? अरविंद तिकडे सत्तेत असताना हा कायदा रोखला होता, मी मुख्यमंत्री असताना हा काळा कायदा रोखला होता, आम्ही दोघंही सत्तेतुन बाहेर गेल्यावर हा काळा कायदा आणला, मग नुकसान कुणाच झालं? माझं झालं? अरविंदच झालं? की राज्याच झालं? कामगारांचं झालं?

अरविंदचं सुद्धा कौतुक एवढ्यासाठी करायला हवं की  जस मी एका क्षणात वर्षा सोडुन दिलं, मुख्यमंत्रीपद सोडुन दिलं आणि ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं हे भाजपवाले गडबड करत आहेत, मी अरविंदला फोन करुन सांगितल,  ‘अरविंद राजीनामा द्या’, ‘येस सर’! का? माझं काय चुकलं? काय करू? असं ते बोलले नाहीत… फोन ठेवला, राजीनामा देऊन आला. ही अशी माणसं, शिवसेनाप्रमुखांनी घडवलेली आहेत.

बारसु वरुन रान पेटवलं जातयं, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं….हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हणतोय. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? बारसु बद्दलची, नाणार बद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका आहे तीच आहे, असेही उद्धव  ठाकरे यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment