आपले हक्क, कामाच्या रक्षणासाठी कामगारांनी एकजूट ठेवावी..
आपले हक्क, कामाच्या रक्षणासाठी कामगारांनी एकजूट ठेवावी..
नाशिक, दि.८ एप्रिल :-
आपले हक्क कायम अबाधित ठेवण्यासाठी कामगारांची एकजूट अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे आपले हक्क, कामाचे रक्षण करण्यासाठी एकजूट कायम ठेवावी असे आवाहन करत इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस व एचएएल कंपनी हा नाशिकचा अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
हिंद मजदुर सभेचा अमृत महोत्सवी सोहळा आज नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस जिमखाना मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात सध्या कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम होत आहे. कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून युनियनचे अस्तित्व कमी होत आहे. या कामगारांच्या हिताचे रक्षण हिंद मजदुर सभा करते आहे,संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद असून शेवटच्या श्वासापर्यंत छगन भुजबळ हा कामगारांच्या प्रश्नांसाठी कायम आपल्यासोबत राहील असे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये काम करणं ही येथील कामगारांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या समाजात कालही होती आणि आजही आहे. मजदुर संघ आणि प्रेस कामगारांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
देशातील सर्वच क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शरद पवार करतात. देशातील कामगार आणि शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्याचे काम आम्ही सर्व शरद पवारांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. एकीच्या बळावरच काम केलं तरच आपले हक्क आणि कामाचे रक्षण केले जाऊ शकते तसेच न्यायही नक्कीच मिळतो. त्यामुळे कामगारांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस आणि एचएएल ही नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाच्या बाब आहे. सध्या अनेक कंपन्या या राज्याबाहेर जात आहे मात्र नाशिकच्या या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या नाही ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.
