अदानीची महागडी वीज राज्यातील वीजग्राहकांचे कंबरडे मोडणार !

0
IMG-20230331-WA0133
अदानीची महागडी वीज राज्यातील वीजग्राहकांचे कंबरडे मोडणार !

मुंबई, दि. ३१ मार्च :

महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना आता वीज दरवाढीच्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. अदानी पॉवरने वीजदरात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणला सादर केला आहे. ही दरवाढ मान्य केल्यास राज्यातील वीज ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक बसणार आहे त्यामुळे भाजपा सरकारने या दरवाढीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, राज्यातील विजेची गरज भागवण्यासाठी महावितरण अदानी पॉवरकडूनही वीज खरेदी करत असते पण अदानी पॉवरकडून २०२३-२४ सालासाठी ६.५५ रुपये दराने वीज खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा दर ३.९२ रुपये प्रति युनीट असा आधी मंजुर केलेला आहे. तर २०२४-२५ साठी ६.६० रुपये प्रति युनिट दर अदानीने प्रस्तावीत केला आहे आधी मंजूर केलेला दर ३.८९ रुपये प्रति युनिट आहे. कोळशाच्या कमतरतेचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याचा अदानी पॉवरचा दावा आहे. प्रत्यक्षात कोळशापोटी अदानीला १६८० कोटी रुपये वाढीव खर्च दाखवला आहे. पण या दरवाढीतून अदानी पॉवरला मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारला या महागड्या वीज खरेदीसाठी पुढील दोन वर्षात २१ हजार कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. अदानी पॉवरकडून दोन्ही वर्षाचे प्रति युनिट दर ६.५५ रुपये आणि ६.६० रुपये पाहता मंजूर केलेल्या दरांच्या तुलनेत ६७%-६९%. जास्त आहेत. अदानी पॉवरचे दर हे इतर वीज कंपन्यांपेक्षा अधिक जास्त आहेत. तरीही सरकार अदानीवरच मेहरबानी दाखवत आहे. या दरवाढीला सरकारने मंजुरी दिल्यास याचा भार वीज ग्राहकांवरच पडणार असून आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला आणखी दरवाढीचे चटके सहन करावे लागतील, असेही राजेश शर्मा म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *