‘त्या’ दोन-तीन महिन्यात ‘त्यांनी’ अख्खा महाराष्ट्र बदलला असेल तर मला माहिती नाही:

0
images (53)

‘त्या’ दोन-तीन महिन्यात ‘त्यांनी’ अख्खा महाराष्ट्र बदलला असेल तर मला माहिती नाही:

नागपूर, दि. २६ फेब्रुवारी ;

काही लोकांना वाटते की सारे काही आपल्याच काळातील आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांपैकी सव्वा दोन वर्ष ते बंद दाराआड होते. उर्वरित दोन-तीन महिन्यात त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल तर मला त्याबाबत माहिती नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाबाबत पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आणि तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. केंद्राने काल त्याला मंजुरी दिली. राज्याच्याही सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे शहराचे नाव बदलले आहे. आता नगरविकास आणि महसूल विभागाच्या अधिसूचना जारी होतील. त्यानंतर संपूर्ण जिल्हा, तालुका, महापालिका आणि नगरपालिकेचीही नावे बदलतील. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा यासाठी अत्यंत आभारी आहे. पण, काही लोकांना वाटते सारे आपल्याच काळातील आहे. कदाचित ते हेही सांगू शकतात की, त्यांनी मोदीजींना फोन केला आणि त्यामुळे हे नामकरण झाले.

कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले असून, त्यांच्याकडून आता रडीचा डाव सुरू आहे. धंगेकर हे मतदारांचा अपमान करीत आहेत. भाजपा कधीच पैसे वाटत नाही. त्यामुळेच लोक आम्हाला निवडून देतात. आमची संस्कृती पैसे वाटण्याची नाही, ती काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने असले उद्योग केले जात आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *