छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराबद्दल मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे आभार !
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराबद्दल मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे आभार !
चंद्रपूर, दि. २५ फेब्रुवारी :
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून, या राज्यातील स्वराज्यशत्रूंच्या निशाण्या अशाच मिटवल्या जातील, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
राज्यातील जनतेच्या मागणीनुसार आणखीही काही परकी आक्रमकांनी दिलेली नावे टप्प्या टप्प्याने बदलली जातील, असे सूतोवाचही मुनगंटीवार यांनी केले आहे.
सुधीर मुनगंटीवार आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की मी विधानसभेत अनेकदा हा विषय उपस्थित केला होता. उस्मानाबाद आणि औरंगाबाद ही दोन्ही नावे परक्या स्वराज्यशत्रूंनी दिलेली नावे होती. उस्मानाबादचे मूळ प्राचिन नाव धाराशिव आहे. परकी आक्रमकाने दिलेले नाव बदलून मूळ धाराशिव हे नाव द्यावे ही स्थानिक जनतेची अनेक दशकांची मागणी होती.
औरंगाबाद शहराचे नाव स्वराज्यशत्रू मुघल आक्रमक औरंगजेबाच्या नावावरून पडले होते, ज्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस अक्षरशः हाल हाल करून ठार मारले होते. त्यामुळे औरंगजेबाने दिलेले औरंगाबाद हे नाव महाराष्ट्रावरचा कलंक होते, जे बदलणे अत्यावश्यक होते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
या दोन्ही नामांतरांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत चर्चा उपस्थित करून ठराव मांडला होता. तसेच ठाकरे सरकार असतांनाच सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी नामांतरे व्हावी अशी मागणी करणारे 176 आमदारांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन राज्य सरकारकडे सादर केले होते. त्या निवेदनासंदर्भात वारंवार अनेक स्मरणपत्रेही त्यांनी तत्कालीन राज्य सरकारला पाठवली होती.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव करण्याची मागणी राज्यभरातील जनता अनेक वर्षे करीत आहे. त्या मागणीनुसार राज्यातील भाजपा शिवसेना सरकारने तसा निर्णय घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यास शुक्रवारी केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे मान्यता दिली. याआधीही मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना सरकारने या नामांतराचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने तांत्रिक मुद्द्यावर स्थगिती दिल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. आता सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून हे नामांतर यशस्वी करण्यात आले आहे.
या नामांतराचा आग्रह सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने धरला होता. विधानसभेत आणि बाहेर आपण या मुद्द्यावर सातत्याने केलेल्या संघर्षाला विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि गृहमंत्री अमित शाह जी यांच्या निर्णायक पाठिंब्यामुळे यश मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
