भाजपाचा मुंबईत ३४६ ठिकाणी ‘जय जय शिवराया’चा जयघोष !

0
भाजपा शिवाजी

भाजपाचा मुंबईत ३४६ ठिकाणी ‘जय जय शिवराया’चा जयघोष !

मुंबई, दि १६ फेब्रुवारी:

हिंदवी स्वराजाचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला मुंबईत भाजपातर्फे २२७ वॉर्डांमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून आघाडी व मोर्चे मिळून ३४६ ठिकाणी  शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी उत्सव जोरदार साजरे करण्यात आले त्याचप्रमाणे आता ‍छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठया उत्साहात मुंबईत साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून प्रत्येक ‍ठिकाणी जय जय शिवराया… या वि. दा. सावरकर यांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष  करुन सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलघडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन

भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून त्याची माहिती ही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, अशी माहिती आमदार अँड शेलार यांनी दिली.

 

 

उत्तर पश्चिम जिल्हात 58, उत्तर पूर्व 50, उत्तर मध्य 63, उत्तर मुंबई 69, दक्षिण मध्य 44, दक्षिण मुंबई 62 असे एकुण 346 ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम साजरा होणार आहे. यातील 36 ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वरळी नाका, माटूंगा स्टेशन, शिवाजी पार्क, राम नगर-मालाड (प), भायखळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, दहिसर, आनंद नगर, शहाजीराजे क्रीडांगण-मालाड, लोखंडवाला-कांदिवली, खार (प)      या ठिकाणांचा समावेश आहे. अशी माहिती आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *