जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू..
जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू..
सिंधुदुर्ग, दि. १६ फेब्रुवारी :-
शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निमित्त होतं वेंगुर्ला येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन..
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगलं घेऊन जाल. आपल्या राज्यात-देशात गुरुला फार महत्व आहे. आई-वडिलानंतर गुरुचं, शिक्षकांचं स्थान हे आयुष्यामध्ये सर्वांच्या आदराचं आहे. शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवित असतात. जसे कुंभार हे मातीला आकार देतो तसेच शिक्षक हे भावी पिढी- नवीन पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचं अतिशय मोलाचं काम करत असतात.
जसे डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. शिक्षकांचं समाजामध्ये फार मोलाचं योगदान आहे. समाज घडविण्याचे काम आपण करत आहात. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरुन शाळेत लवकर पोहचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत. मी आणि उपमुख्यमंत्री मिळून या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचं हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील घटकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत.
चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरु आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारतोषिक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याच निर्णय तात्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हे ज्ञान दानाचं काम करत असतो. पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे.
राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये देखील शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालकांचा व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्स मध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचं मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अभिनंदन करतो. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तरुण पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचं योगदान फार महत्वाचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नविन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिले जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारचा नविन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्याने दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील. असेही ते शेवटी म्हणाले.
