बाळासाहेबांनी शब्द टाकला नसता तर मोदी पंतप्रधान पदापर्यंत आले असते का ?
बाळासाहेबांनी शब्द टाकला नसता तर मोदी पंतप्रधान पदापर्यंत आले असते का ?
मुबई, दि. १३ फेब्रुवारी:
शिवसेनेने २५-३० वर्ष एक राजकीय मैत्री जोपासली पण त्यातून शिवसेनेला काय मिळाले? हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा, त्यांना कोणाचीच गरज नव्हती. अकाली दल, शिवसेना नको होती भाजपाला. जेव्हा भाजपा अस्पृश्य होती तेव्हा वाईट दिवसात शिवसेनेने त्यांच्याशी युती केली. अटल बिहारी वाजपेयी राजधर्माचे पालन करणार होते. पण काळाची गरज म्हणून बाळासाहेबांनी शब्द टाकला आणि नरेंद्र मोदींना वाचवले, तसे झाले नसते तर आज मोदी पंतप्रधानपदापर्यंत आले असते का? असा खणखणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
गोरेगाव येथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी कधीही द्वेषभावना ठेवली नाही. आम्ही हिंदू म्हणजे केवळ मराठी आहोत असे नाही आणि हिंदी भाषिकांचा द्वेष करा अशी आमची कधीच भावना आणि कृती नव्हती. हिंदू म्हणजे आपण सगळे एकच. देश विरोधात कुठलाही धर्मीय असो तो आमचा शत्रूच ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. आम्ही भाजपची साथ सोडली हिंदुत्व नव्हे, आम्ही काल, आज आणि उद्यापण हिंदूच. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्यांचे हवे तसे हिंदुत्व मी मानत नाही.
उत्तर भारतीयांच्या समवेत आज आलो आणि आज कुरिअरने पार्सल परत जातेय. ताकाला जाऊन भांडे आम्ही लपवत नाही. आमच्यातले काही गळ्यात पट्टा घालून त्यांच्या मागे गेले. मला बाळासाहेबांनी कुणाची गुलामी करायला नाही शिकवले नाही. नरेंद्र मोदी परवा मुंबईत येऊन पोळ्या भाजून गेले, हेच जर मी केले असते तर ? मी बोहरा समाजाच्या विरोधात नाही. त्यांनी केले तर सगळे माफ, आम्ही केले तर गुन्हा. तो चष्मा आता बदलायला हवा. सगळ्यांसाठी आमच्या मनात चांगल्याच भावना. सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे.
दोनवेळा शिवसैनिक रस्त्यावर उतरला, १९९२-९३ आणि मी मुख्यमंत्री असतांना कोरोना काळात. मी कधीच मराठी अमराठी, हिंदू मुसलमान असा भेदभाव केला नाही. भाजपाला फक्त सत्तेच्या घोड्यावर बसायचे आणि इतरांमध्ये भांडणे लावयाची ही भाजपाची निती आहे. मी डोळे उघडायला आलोय, असाच कारभार सुरु राहिला तर हिंदुत्व धोक्यात येईल. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी दिली. २०१८ साली मी रामलल्लाच्या दर्शनाला गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो. शरयू मातेची आरती केली. कुणी मान्य करो अथवा नाही पण त्यानंतर राम मंदिरावर न्यायालयाचा निकाल आला आणि मी मुख्यमंत्रीपण झालो.
राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व,ह्दयात राम आणि हाताला काम हेच आपले ध्येय. अनेक वर्षांनी बाळासाहेबांच्या वेळची सर्व लोक पुन्हा भेटतायत. एक चांगली एकजूट होतेय. सर्वसामान्यांच्या स्वप्नातला एक राष्ट्र निर्माण करायचे आहे. परवा जैन बांधवांच्या कार्यक्रमात गेलो ते म्हणाले उध्दवजी आप खून माँगोगे तो खून भी देंगे, मी म्हणालो खून नही सिर्फ वोट दिजीए. आता स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी एकत्र यायलाच हवे. अजून काही लोकांशी संवाद साधायचा आहे, मग जाहीर सभा घेऊ.
आताही भाजपची निवडणुक घेण्याची हिंमत होत नाही. हिंमत नाही आणि हिंदूंचे नेतृत्व करतायत असं यांचे म्हणणे. हिंदू असा लेचापेचा नाही, घ्या निवडणुका, मी आज पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपण भेदभावाच्या भिंती उभारल्या तर आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल. आपले ऐक्य हीच आपली शक्ती. म्हणूनच आपल्याला एकत्रित राहावे लागेल. मधल्या काळात काही गैरसमज निर्माण झाला होता तो आज दूर करुन हातात हात घालून आपण पुढे जाऊ.
