पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते सोलापूर व शिर्डीसाठी ‘वंदे भारत’ रेल्‍वेचे लोकार्पण.

0
IMG-20230210-WA0104

पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते सोलापूर व शिर्डीसाठी ‘वंदे भारत’ रेल्‍वेचे लोकार्पण..

मुंबई, दि. १० फेब्रुवारी :
‘वंदे भारत’ ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. हे भारताच्या गती आणि प्रमाणाचे प्रतिबिंब आहे. भारत किती वेगाने प्रगती करत आहे ते तुम्ही पाहू शकता. वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना मिळेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दोन वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्ती भेट देत स्वागत केले. कार्यक्रमास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी साडेतीन वाजता दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच त्यांनी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचेही लोकार्पण केले.

नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘वंदे भारत’ ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत असून ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक, शेतकरी आणि भाविक यांना याचा फायदा होईल. देशात मेट्रोचा विस्तार होत आहे. देशात नवीन विमानतळ बनवली जात आहेत. आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इथे जमलेले सगळेच लोक या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबईसाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत ट्रेन्स एकत्र सुरू झाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना प्रोत्साहन देणाऱ्या या दोन ट्रेन आहेत. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणे वंदे भारतमुळे सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणे सोपं होणार आहे. एकूणच प्रगतशील मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी, आज शुभेच्छा देतो. मला हा विश्वास आहे की, डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल. महाराष्ट्रात रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होणार आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या ५ मिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं जे स्वप्न आहे, त्यात महाराष्ट्र १ मिलियन डॉलरची भर टाकेल, असेही ते म्हणाले. यावेळी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी पहिल्यांदाच रेल्वेसाठी मिळाले आहेत. हे सामान्य लोकांचे सरकार आहे, फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे सर्व शक्य झाले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाविक आणि प्रवाशांसाठी ही ट्रेन मैलाचा दगड ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राला रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करतो.”कोणी कल्पना केली नसेल की, भारतात अशा प्रकारची गाडी धावेल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात लिहले जाईल असेही ते म्हणाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनअंतर्गत रेल्वे चांगली प्रगती करेल, मुंबईकरांसाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *