महाराष्ट्राच्या कुस्तीला जपानच्या सुमोचा मदतीचा हात !

0
IMG-20230203-WA0220

महाराष्ट्राच्या कुस्तीला जपानच्या सुमोचा मदतीचा हात !

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी :

भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे आणि वैविध्यपूर्ण असे विविध अनेक प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात जपानने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा विश्वास मला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की भारत आणि जपान यांचे पूर्वापार संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. यापुढेही ठरेल असा मला विश्वास आहे. त्याच दिशेने काम करण्याचा निर्धारही करू. ऑक्टोबर २०१३ मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला आहे. या कराराची ही दशकपूर्ती आहे. या कराराचे आपण नूतनीकरणच करत आहोत. गेल्या दहा वर्षांत या करारातील उद्दिष्टांची जी पूर्ती झाली त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो आणि या नव्या करारासाठीही शुभेच्छा देतो.

जपान आणि महाराष्ट्रचा गुण लढवय्येपणा, उद्यमशीलता आणि नावीन्याचा ध्यास घेणारा आहे. कुस्ती दोन्हीकडे लोकप्रिय आहे. त्यामुळे कुस्तीबाबत महाराष्ट्राचे क्रीडा संचालनालय आणि Wakayama Prefecture Wrestling Federation (वाकायामा प्रीफेक्चर रेसलिंग फेडरेशन) यांच्या दरम्यान होणार हा करारही महत्वाचा आहे. यामुळे कुस्तीमधील प्रशिक्षणापासून ते खेळाडूंच्या सुविधांबाबत आदान-प्रदान होईल. तसेच खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पर्यटनाच्या क्षेत्रात जपानने खूप मदत केली आहे. जपानमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे कार्यालय आहे आणि संभाजीनगरमध्ये जपानचे कार्यालय आहे. या नवीन सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर जपान आणि राज्याचे संबंध अधिकच मजबूत होतील. या सामंजस्य करारामुळे जपान आणि महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक देवाण- घेवाण होऊन पर्यटनाला चालना मिळेल. आजच्या सामंजस्य करार नुतनीकरणामुळे राज्यातील पर्यटन विकास होण्यास मदत होणार आहे.

पर्यटन मंत्री लोढा म्हणाले,अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी वाकायमा शासनाने ३०० कोटी रुपयांचे सहकार्य केले.पर्यटन क्षेत्रातच फक्त या सामंजस्य करारा मुळे मदत होणार नसून अन्य क्षेत्रातही प्रगती होण्यासाठी मद होणार आहे.सुमो कुस्ती प्रकार देखील मुंबई करांना पहाता येणार आहे असेही लोढा म्हणाले.

वाकायामाचे गव्हर्नर किशीमोटो शुहेही म्हणाले, की महाराष्ट्र राज्य आणि जपानचे वाकायामा प्रांत यांच्यात सुमो व कुस्ती खेळ याबाबत सन २०१३ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्प होते. कोयासन विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे अनावरण, यशदा मार्फत महाराष्ट्रातील शहरी विकास अधिका-यांसाठी वाकायामा येथे प्रशिक्षण,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी Omotenashi (जपानी आदरातिथ्य) प्रशिक्षण, शालेय विद्यार्थासाठी सांस्कृतिक वारसा प्रशिक्षण, जपानी मार्गदर्शक प्रशिक्षण, वाकायामा येथील हेंगू अभ्यागत केंद्र व अजिंठा अभ्यागत केंद्र यांच्यात सामंजस्य करार,कोयासन विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार, टोकियोमध्ये एमटीडीसी माहिती कार्यालय आणि औरंगाबाद आणि मुंबई येथे वाकायामा कार्यालय उघडणे, वाकायामा येथून या कार्यालयांमध्ये अधिकारी प्रतिनियुक्ती, ट्रॅकव्हल एजन्टसाठी परिचय, पर्यटन प्रसिद्धी उपक्रम, अजिंठ्यावरील डॉक्युमेंटरी कार्यक्रम पार पडले. आजच्या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांच्या विकासात भरत पडेल असेही शुहेही म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *