बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र नवीन संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये लावा.
बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र नवीन संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये लावा…
नाशिक, दि.२८ जानेवारी :-
हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात यावे यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे थोर महापुरूष बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.
थोर महापुरूष हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
