राजभवनमध्ये साकारणार ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्प’.
राजभवनमध्ये साकारणार ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्प’..
मुंबई, दि. २७ जानेवारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्याना’चे उद्घाटन केले.राजभवन येथे नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले.
दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात ‘अटल उद्यान’ बनविण्यात आले असून ते जपानी गार्डनच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेले.’अटल उद्यान’ तसेच जैव विविधता प्रकल्प राजभवन येथे भेट देणाऱ्या देशीविदेशी पाहुण्यांकरिता तसेच नागरिकांकरिता आकर्षण ठरणार आहे.
राजभवनातील प्रस्तावित जैव विविधता प्रकल्प यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे. असीम गोकर्ण यांनी अटल उद्यानाचे रेखाचित्र तयार केले असून यात गझेबो, पाण्याचा धबधबा, हंगामी फुलझाडे, पूल, सेल्फी रिंग, वॉकिंग ट्रॅक, बांबू ग्रास तसेच विविध झाडे लावण्यात आली आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी चहापानाचे आयोजनही केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विविध देशांचे मुंबईतील राजदूत, उद्योजक, सशस्त्र सैन्य दल, प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी आणि विविध क्षेत्रातले मान्यवर चहापानाला उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या आंतर विद्यापीठ अविष्कार संशोधन महोत्सवात निवडल्या गेलेल्या व विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या २७ नवसंशोधन व स्टार्टअप संकल्पनांचे प्रदर्शन राजभवनाच्या हिरवळीवर मांडण्यात आले होते. राज्यपालांच्या चहापानापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सर्व युवा संशोधकांना कौतुकाची थाप दिली.
