Ads

-

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सहा महिन्यात सुरु करण्याचे आश्वासन !

By Xtralarge News

January 20, 2023 6:16 pm

Ads

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सहा महिन्यात सुरु करण्याचे आश्वासन :

मुंबई, दि. २० जानेवारी
अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपून बंद असल्याने लाखो कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. ही जागा अत्यंत मोक्याची असल्याने ती एका उद्योगपतीच्या घशात घातली जात असल्याचे षडयंत्र आहे परंतु या रुग्णालायाचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरु करु व सहा महिन्यात पूर्ण हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.

कामगारांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या अंधेरीतील कामगार हॉस्पिटलप्रश्नी राजेश शर्मा यांनी आवाज उठवला होता. हे हॉस्पिटल उद्योगपतीच्या घशात घालू नका व एका महिन्यात हॉस्पिटल सुरु करा अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तात्काळ दखल घेऊन एका बैठकीचे आयोजन केले होते. यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार बैठक घेतली. या बैठकीत ESIC चे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, मी व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते. काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरु होण्यास विलंब होत आहे परंतु यातून लवकरच मार्ग काढून पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरु करु व सहा महिन्यात हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुरु केल्या जातील असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेडस व मेडीकल कॉलेज होते. या रुग्णलयात OPD , IPD (350 बेड्स) ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. अंधेरीतील हे ह़ॉस्पिटल लवकर सुरु करावे अशी कामगारांची मागणी आहे, असेही राजेश शर्मा म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment