‘AAP’ महाराष्ट्रातील सर्व निवडणुका ताकदीनिशी लढवणार
‘AAP’ महाराष्ट्रातील सर्व निवडणुका ताकदीनिशी लढवणार..
मुंबई, दि. ९ जानेवारी २०२३
महाराष्ट्राला एका प्रामाणिक राजकीय पर्यायाची गरज असून आम आदमी पार्टीच्या रूपाने तो अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील जनतेने सर्व पक्षांना मतदान केले, सर्वांना संधी दिली पण महानगरपालिका, नगरपरिषदेत सर्वांनी मिळून जनतेची लूट केली आहे. आम आदमी पार्टी जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे. राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम आदमी पार्टी महाराष्ट्रात संघटना बांधणीचे काम संपूर्ण ताकदीनिशी करत आहे आणि आगामी काळात महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक असो संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत, असे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये सरकार स्थापन केले आणि अलीकडेच गुजरातमध्ये १३% मतांसह ४० लाख लोकांचा विश्वास जिंकला व ५ आमदारांसह राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. भाजपची वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या दिल्लीतील एमसीडीला उखडून टाकण्याचे आणि संपूर्ण देशात नवी आशा व नवा विश्वास निर्माण करण्याचे काम आम आदमी पार्टीने केले आहे. आपल्या राज्यात आम आदमी पक्षाचा विस्तार व्हावा, अशी मागणी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक करत आहेत. संपूर्ण देशातील लोक अरविंद केजरीवाल यांच्या मॉडेल ऑफ गव्हर्नन्सला मानतात व आपल्या राज्यात सुद्धा ते असावे, असे प्रत्येकाला वाटते. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी खूप वाढली आहे.
महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि नेते खूप आहेत पण जनतेच्या फायद्याचा एकही पक्ष व नेता नाही. देशातील जनता खूप त्रस्त झालेली आहे. जनतेच्या भल्यासाठी कुणीही काम करत नाही आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो की विरोधी पक्ष, सर्वांनी जनतेला देवाच्या दयेवर हतबल करून सोडले आहे.
आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यावेळेस म्हणाल्या की, मुंबईतील सर्व वॉर्डांमध्ये आम्ही पूर्ण जोमाने निवडणूक लढवणार आहोत. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसह सर्व प्रश्न व समस्यांचे निराकरण करू. एकनाथ आणि देवेंद्र म्हणजेच ईडी सरकारने आतापर्यंत फक्त निविदा काढण्याचे आणि जनतेला लुबाडण्याचे काम केले आहे. याआधीचे सत्ताधारी पक्ष किंवा आताचे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी कोणतेही काम करत नाही आहे.
