अजित पवारांविरोधात गोरेगाव, अंधेरीत भाजपाचे आंदोलन.
अजित पवारांविरोधात गोरेगाव, अंधेरीत भाजपाचे आंदोलन…
मुंबई, दि: ५ जानेवारी :
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेले बेताल वक्तव्य तसेच जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या केलेल्या स्तुतीच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीने आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आ. विद्या ठाकुर यांच्या उपस्थितीत गोरेगाव पश्चिम येथे तर आ. अमित साटम यांच्या नेतृत्वात अंधेरीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
आ. विद्या ठाकुर म्हणाल्या, हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्यातून अपमान झाला आहे. यापुढे महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. औरंगजेबाच्या बाबतीत कोणाचं प्रेम ऊतू जात आहे हे यानिमित्ताने जनतेला कळले असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना आ.अमित साटम म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपशब्द वापरणे हे चुकीचे असून यापुढे असे वक्तव्य कोणी केल्यास जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा आ. अमित साटम यांनी दिला.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, दिलीप पटेल, माजी नगरसेवक दिपक ठाकुर, संदिप पटेल यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
