अमृत काळात भारत आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा

0
IMG-20230103-WA0106

अमृत काळात भारत आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा…

नागपूर, दि. 3 जानेवारी : –
भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपुर्ण असून महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. येत्या ७ जानेवारीपर्यंत येथे विविध विज्ञान विषयक चर्चासत्रे व सादरीकरण होणार आहे.

आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की,  येत्या २५ वर्षात भारत कोठे असेल याचे अनुमान करण्यात विज्ञानाची भूमिका मोलाची आहे. ज्यावेळी वैज्ञानिक संशोधनाला देशसेवेच्या भावनेची जोड मिळते त्यावेळी मिळणारे परिणाम अभूतपुर्व असतात. निरीक्षण हा विज्ञानाचा पाया आहे. निरीक्षणाच्या जोडीला केले जाणारे प्रयोग त्यातून मिळणारी तथ्ये आणि त्यांचे विश्लेषण हे महत्त्वाचे असते. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करणे हे वैज्ञानिकांसाठी महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने सध्याच्या काळात भारताकडे  मोठ्या प्रमाणावर डाटा आणि तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. या नव्या क्षेत्रात भरारी घेण्यास भरपूर वाव आहे. पृथ्थकरण केलेल्या माहितीचे ज्ञानात रुपांतर करणे आणि  ज्ञानातून विज्ञान संशोधन करणे हे परस्परांना मदत करणारे घटक ठरु शकतात.

प्रधानमंत्री म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टीला चालना दिल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आपण सध्या विकसीत देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन सुचित ४० व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पीएचडी  करण्याबाबतही आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. स्टार्टअप देशांच्या इकोसिस्टिम सुचित आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

मध्यवर्ती संकल्पनेबाबत बोलतांना प्रधानमंत्री म्हणाले की, विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने शाश्वत विकास आणि महिला सक्षमीकरण हे शब्द जोडले आहेत. हे खरेच आहे की, महिलांच्या सहभागामुळे विज्ञान तंत्रज्ञानाला नवी गती प्राप्त झाली आहे. महिलांचा सर्वच क्षेत्रातील सहभाग  हा वाखाणण्यासारखा आहे. येत्या जी २० परिषदेचे यजमानपद भूषवित असतांनाही आपण  महिलांच्या पुढाकारातून विकास हे सूत्र ठरविले आहे. महिलांनी विज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात असाधारण कार्य केले आहे. इतकेच नव्हे तर स्टार्टअप आणि मुद्रा योजनेसारख्या लहान व्यवसायांना चालना देणाऱ्या योजनेत महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. ज्यावेळी महिलांना चालना मिळत असते त्यावेळी तो समाजही प्रगत होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *