शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाखांची मदत द्या.
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाखांची मदत द्या.
नागपूर, दि. २८ डिसेंबर :-
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. ओबीसी विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज, पशुधन नुकसान भरपाई द्यावी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करत ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाने नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा राज्यातला शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने अनेक भागात पिके वाहून गेली आहेत. शेतजमिनी खरवडून गेल्याने नापिकी झाल्या आहेत. पशुधन वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. खरीपाबरोबर रब्बीचासुद्धा हंगाम वाया गेला आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, कडधान्य, भाजीपाला, धान, संत्रा पिकांचे झालेले नुकसान प्रचंड आहे. हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
विमा कंपन्यांकडून शेतक-यांची पिळवणूक होत आहे. पीक विम्याचे दावे मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले असून प्रलंबित दाव्यांची संख्याही मोठी आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला असून दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचे असेल तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली.
नाशिक जिल्ह्यात १३६ टक्के पाऊस, सततच्या पावसाने अब्जावधीचे नुकसान झाले आहे. अक्षरशः उभी पिके सडवत पावसाळा संपला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नुकसानग्रस्त विभागातील पंचनामे सदोष असल्याने पंचनाम्याच्या वस्तुनिष्ठ अहवाला अभावी अनेक पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. २४ तासात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे हे नुकसान निकषात बसत नसल्याचे सांगितले जात आहे. मुळात पाऊस ६५ मिमी नसला तरी आठ-आठ दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबून पिके हातची गेली आहेत. मात्र शासनाकडून निकषाकडे बोट दाखवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवलेले आहे या नुकसानीबाबत महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनास पाठविलेला आहे मात्र अनेक दिवस होवूनही शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
