सुधीरभाऊंच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या वन विभागाचा नावलौकिक :
सुधीरभाऊंच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या वन विभागाचा नावलौकिक :
नागपूर, दि. १८ डिसेंबर :
मंत्र्याकडे कोणतेही खाते असले तरी त्यांची तळमळ, समर्पणभाव आणि काम करण्याची जिद्द यातून त्या खात्याची ओळख होत असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याची धुरा सांभाळली. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्राच्या वनखात्याला देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होते नागपूर येथे वन भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्य वनबल प्रमुख वाय. एल. पी. राव, आमदार आशिष जयस्वाल, आमदार देवराव होळी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकुद्दे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके व्यवस्थित चालतील, असे काम मुनगंटीवार यांनी केल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोट्यवधींचा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वन्यजीव आणि वनक्षेत्रात वाढ झाली. अगोदरच्या पाच वर्षांत वन विभागात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले काम जगाचे लक्ष वेधणारे आहे. केवळ वृक्षारोपणापर्यंतच ही जनचळवळ थांबली नाही, तर वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाऊ लागला. कार्यकुशलता आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टी मुनगंटीवार यांना दैवी देणगी असल्याचे ते म्हणाले.
बदलत्या हवामानामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची मोठी समस्या आपाल्यापुढे आहे. वेळीअवेळी अतिवृष्टी होते. त्यातून मोठी हानी होते. अशात पर्यावरण संतुलनाची मोठे आव्हान वन विभागापुढे आहे. आता महाराष्ट्रात ‘अर्बन फॉरेस्ट’चेही काम सुरू झाले आहे. त्यातून शहरी भागात प्राणवायूचे प्रमाण निश्चित वाढेल. प्राणवायू किती मोलाचा असतो, हे कोविड महासाथीने सर्वांना शिकविले. पर्यावरण आणि वन्यजीवांची काळजी घेतल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असल्याचे ते म्हणाले.
