Ads

---

महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हल्लाबोल महामोर्चा.

By Xtralarge News

December 17, 2022 5:55 pm

Ads

महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हल्लाबोल महामोर्चा..

मुंबई, दि. १७ डिसेंबर:

राज्यात सहा महिन्यापूर्वी जे सरकार सत्तेत आले त्यामुळे दुर्दैवाने राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा डाग लागला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा महामोर्चा असून महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा हल्लाबोल महामोर्चा आयोजित केला असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांच्या नावांची यादी आहे. ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे ? यामागील मास्टमाईंड कोण आहे? हे का थांबत नाही ? असे अनेक सवालही अजित पवार यांनी राज्य सरकारला केले.

माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की, त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्यांचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. याविरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

महापुरुषांचा होणारा अपमान पहाता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे. या सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी करतानाच अशाप्रकारच्या विधेयकाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही अजित पवार म्हणाले.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गावे कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी असेही अजित पवार ते म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment