हिंदुजा समूह राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार.
हिंदुजा समूह राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार.
मुंबई, दि. १६ डिसेंबर-
हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासना बरोबर सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी हिंदुजा समूहाने राज्यात सामंजस्य करार केला आहे.
नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या ११ क्षेत्रात हा उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीस हिंदुजा ग्रुपचे जी. पी. हिंदुजा, अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुजा समूहाचे स्वागत करुन महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अत्यंत कमी कालावधीत हा सामंजस्य करार होत असल्याचे सांगून महाराष्ट्रातील भूमिपुत्र म्हणून हिंदुजा समूहाने या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समूहाचे कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी शासनाने ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली असून त्यातून ५५ हजारांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. सरकारी विभागांमध्ये ७५ हजार नोकऱ्या आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, मात्र खाजगी क्षेत्रातही आता या गुंतवणुकीमुळे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांच्या जीवनात परिवर्तन येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मी महाराष्ट्रातील असून १९१४ पासून इथे राहतो, राज्याच्या प्रगतीसाठी, समाजसेवेसाठी शिक्षण, आरोग्य, निर्मिती उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात काम करून, अमेरिका, इंग्लंड येथील उद्योजक मित्रांना देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी आणणार असल्याचे सांगून अतिशय कमी वेळेत विविध निर्णय घेऊन सरकार गतीने काम करीत असल्याबद्दल हिंदुजा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले.
