सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचे ?

0
IMG-20221214-WA0045

सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचे ?

मुंबई, दि. १३ डिसेंबर –
नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. जाहीर सभेला पक्षाच्यावतीने गेले, निवडणूक प्रचाराला गेले आणि पक्षाची भूमिका मांडतात त्यावेळी विरोधकांवर टीका टिपण्णी करण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. रेल्वे, रस्ते उद्घाटन, हॉस्पिटल उद्घाटन आणि सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान ज्यावेळी करतात त्या व्यासपीठावर विरोधकांवर टिकाटिपणी करणे ही जर भूमिका मांडतात हे कितपत शहाणपणाचे आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पवारसाहेबांना अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

मी अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले, भाषणे ऐकली आहेत. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून त्यानंतरचे पंतप्रधान असोत निवडणूकीच्या प्रचाराला गेल्यानंतर विरोधी पक्षाची सरकारे असली तरी नेहरूंनी त्यांच्या विरोधकांवर कधी टिका केली नाही. आपली भूमिका मांडली पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष,यासुध्दा लोकशाहीच्या संस्था आहेत. त्या संस्थांचा सन्मान ठेवला पाहिजे. या सगळ्या भूमिका देशाच्या स्वातंत्र्यलढ्यानंतरच्या पंतप्रधानांनी पाळल्या परंतु आता पाळले जात नाही याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. समृद्धी रस्त्याला विरोधकांनी विरोध केला. मला माहिती नाही कुणी विरोध केला. माझा एक अनुभव सांगतो, मी औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. हा जो रस्ता होतोय त्यामध्ये जमीनी घेत आहेत. त्या जमीनीची रास्त किंमत देत नाही हे ऐकल्यानंतर मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि हा विकासाचा प्रकल्प आहे तो होत असेल तर विरोध नाही परंतु ज्यांच्या जमीनी घेत आहात त्यांचे आयुष्य व उत्पन्नाचे साधन आहे त्यांना रास्त किंमत द्या आणि त्यांना सन्मानाने जगता येईल असे सुचवले होते मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधी विरोध केला नाही असे स्पष्ट करतानाच सत्ताधारी सांगून टाकत आहेत की आम्ही चांगलं काम करतोय पण विरोधकांचा विरोध आहे याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मध्यंतरी काही प्रकार झाले आणि जो काही प्रकार झाला ते योग्य नाही त्याचे मी समर्थन करणार नाही. विरोधकांवर टिका करायचा अधिकार आहे तसा सत्ताधाऱ्यांवर टिका केली पाहिजे परंतु टिका करणे म्हणजे अंगावर शाईफेक करणे हा नव्हे. आम्ही याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु शाईफेक झाल्यावर त्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी बोलणे केले नसते तर असा प्रकार झाला नसता. त्यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर, यांचा उल्लेख केला. फुले आणि आंबेडकरांचे जीवन संपूर्ण देशाला माहित आहे.

भाऊराव पाटील यांनी आपलं आयुष्य ज्ञानादानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीचे दागिने विकून शिकणार्‍या मुलांचे दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली याची आठवण करून देतानाच शरद पवार यांनी ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीद वाक्य असलेल्या रयतमध्ये मी अध्यक्ष आहे. गेली ५० वर्षे त्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारीवर आम्ही काम करतो. हे काम करत असताना आम्ही राजकीय पक्षाचे जोडे कधी घालत नाही. तिथे सामान्य कुटुंबातील मुलामुलींना दालन कसे खुले राहिल, त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल असा प्रयत्न असतो. अशा संस्था किंवा महात्मा फुले, आंबेडकराबाबत बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर असे घडले नसते. ठीक आहे झाले ते झाले परंतु लगेच गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून दाखवले. मंत्रीमंडळात मंत्री होतात. अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? असा सवालही शरद पवार यांनी करताना कितीतरी लोक असे आहेत. त्यांच्यावर टिका टिपण्णी झाली परंतु त्यांनी हा कांगावा कधी केला नाही हे दुर्दैव आहे. हे कधी घडलं नसते तर चांगले झाले असते मी याचे समर्थन करत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्व मित्रांना मग ते कोणत्याही पक्षाचे असोत टिका होईल परंतु शाई टाकणे व तत्सम हे काम कधी करणार नाही ही भूमिका आपण घेऊ आणि महाराष्ट्राची जी एक सुसंस्कृत परंपरा आहे ती टिकवू आणि याची काळजी घेऊ असे आवाहनही शरद पवार यांनी केले

आपण एकसंघ राहूया राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू आणि देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया त्यासाठी सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सर्वांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *