Ads

-

वीज बिल सक्ती व पीकविमा धोरणाविरोधात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन

By Xtralarge News

December 2, 2022 11:25 am

Ads

वीज बिल सक्ती व पीकविमा धोरणाविरोधात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन..

संभाजीनगर दि. 2 डिसेंबर –
शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीकविमा कंपनीच्या धोरणाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून  गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी रस्त्यावर चारा जाळून मिंदे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंबादास दानवे यांच्या सह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी कारवाई करत दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, एकीकडे अस्मानी संकटाने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे सुलतानी राज्यकर्त्यांच संकट शेतकऱ्यांवर दबाव टाकतोय. वीज बिलाची सक्ती सरकारकडून होत असून डीपी वरून सर्व शेतकऱ्यांच्या वीज तोडण्या केल्या जात आहेत. हे सर्व उघड्या डोळ्याने सरकार बघत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीकाची नासाडी झाली, आता रब्बी हंगामातील पीक येणार असताना वीज तोडणी करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

चिखली येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आलं. सरकारने वीज बिल सक्ती न थांबवल्यास व पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांना तत्काळ न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवे यांनी सरकारला दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, अंकुश सुंभ,  तालुका प्रमुख दिनेश मुथा, सुभाष कानडे, उपतालुका प्रमुख विष्णू जाधव, जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर, उप सभापती संपत छाजेड,शहर प्रमुख भाग्येश गंगवाल, अमोल शिरसाठ, महिला आघाडी तालुका संघटक अर्चना सोमासे, यांच्यासह गंगापूर तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment