सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी

0
सातारा

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी….

सातारा दि. २५ नोव्हेंबर :

महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

पारंपरिक शेतीला अत्याधुनिक शेतीची जोड देत शेतकरी शेती करण्याबरोबर सेंद्रीय शेतीकडेही वळत आहेत. अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एन. डी. आर. एफ. च्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली. जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावली त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांमध्ये मान्सुन कालावधीत मोठा पाऊस पडतो. पण जानेवारीनंतर येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांना बारमाही पाणी मिळावे म्हणून जलयुक्त शिवारासारखी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री देसाई यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *